लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. “काय करीत होतास” असे विचारल्यावर “आई, चिंता करितो विश्वाची” असे उत्तर त्याने दिले होते.या मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी “सावधान” हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.