संत ज्ञानेश्वर (जन्म : आपेगाव-पैठण, श्रावण कृष्ण अष्टमी, इ.स. १२७५; संंजीवन समाधी : आळंदी, इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.