Zimmad | झिम्माड – भाग २
पहाटे पावसाच्या आवाजाने जाग आली अजूनही बाहेर अंधारलेलंच होत. कूस बदलून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण डोळ्यासमोरून तुझा चेहरा काही जाईना. वाटलं उठून तुला पत्र लिहावं माझ्या मनातल्या भावना शब्दात उतरवाव्यात अंगाला बोचणारा गारठा अंगभर शहारे आणत होता अगदी तुझा स्पर्श झाल्यावर येतो ना अगदी तसाच. अजूनही लाईटस आले नव्हते धडपडत मी दिवा लावून आणला दिव्याच्या अंधुक प्रकाशात डायरी उघडून लिहायला सुरुवात केली. मनातल्या आठवणी शब्दात उतरु लागल्या. एक एक शब्द काळजाला भिडणारा अगदी तुझ्याच सारखा. लिहता लिहता मन तुझ्या दुनियेत कधी पोहचलं कळल देखील नाही.
तुला आठवते का आपली ती पहिली भेट? समुद्राच्या उसळत्या लाटा, हवेत पावसाळी गारवा उंचच उंच नारळींची दाटी. तू केव्हापासून माझी वाट पाहत उभा होतास. घाई घाईत मी पोहचले अन त्यांनतर आठवतंय का? तू असा एकटक माझ्याकडे बघत होतास आणि मी पूरती गोंधळून गेले होते. हळूहळू तू माझ्या जवळ आलास मी एक एक पाऊल मागे सरकत होते. मागे सरकत सरकत मी एका नारळी च्या झाडाला टेकली तू एक हाथ नारळीला टेकवून हळू हळू जवळ येत होतास. माझी अस्वस्थता आणि केविलवाणा चेहरा बघून गालातल्या गालात हसत होतास. तू आणखी जवळ येतोयस हे पाहून मी घट्ट डोळे मिटून घेतले. अलगद तुझा हात माझ्या गालावरून फिरला आणि अंग शहारून गेलं. डोळे उघडून तुझ्याकडे पाहते तर तू आपला माझ्या केविलवाण्या अवताराकडे बघुन हसत होतास. फार राग आला होता तुला हसताना पाहून पण तुझ्या स्पर्शाने जादू केली.
तुझ्या नजरेला नजर मिळाली आणि मी सारं जग विसरून गेले. एकटक पाहतच राहिले तुझ्या डोळ्यात. किती बोलके होते तुझे डोळे आणि तितकेच खट्याळ देखील. नजरेची भाषा नजरेला कळली तुझ्या ओठावरच हसू हवंहवंस वाटू लागलं. देह भान विसरून आपण एकमेकांत विरून गेलो. किती वेळ आपण असं एकमेकांकडे पाहत उभे होतो देव जाणे. पावसाच्या थेंबांनी भानावर आलो पण एव्हाना दोघेहि चिंब ओले झालो होतो. आता भिजलोच आहोत तर कशाला आडोश्याला जाऊन उभं राहायचं असं म्हणत तू आणखी भिजण्याचा हट्ट केलास. मी तर चिंब ओली न्हाऊन निघाली होती तुझ्या प्रेमात मग हा पाऊस काय चीज? तू पावसाच्या एक एका थेंबासोबत खेळत होतास आणि मी तुला न्याहाळण्यात दंग होते. ओल्या शर्ट मधून तुझे पिळदार बाहू पाहुन मी स्वतःशीच लाजले अन इतक्यात तुझी नजर माझ्याकडे गेली. माझी चोरी पकडली ह्या अविर्भावात तू पुन्हा मिश्किल हसलास अन मी बावरून इकडे तिकडे पाहू लागले.
थोडा वेळ निवांत बसावं म्हणून बाकावरून जाऊन बसलो तुझ्या इतक्या जवळ असण्याचा मनाला कोण आनंद होता. तू हळूच हात हातात घेतलास तुझ्या स्पर्शाने मी मोहरून गेले. तू माझ्याकडे पाहिलंस अन नजर नजरेशी हितगूज करू लागली.तू आणखी जवळ येऊ लागलास. मी हळू हळू तुझ्या हातातला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि तू तो आणखी घट्ट पकडून माझ्या अजूनच जवळ येत होतास. मी हळूच माझा ओला पदर तुझ्या चेहऱ्यावर फेकला आणि पटकन हातातला हात सोडवून घेत मागे सरकले. एका हातात पदर पकडून तू नजर रोखून पाहिलंस झालं पुन्हा माझा डाव फसला. हळू हळू तू पुढे सरकत गेलास अलगद माझ्या केसांवरून हात फिरवून ते मागे सारलेस आणि चेहरा ओंजळीत पकडून चेहरा न्याहाळू लागलास. क्षणभर श्वास थांबले हृदयाचे ठोके वाढू लागले. तू हळू हळू जवळ सरकत होतास मी डोळे घट्ट मिटून घेतले. कपाळावर तुझ्या ओठांचा स्पर्श झाला अन मी नखशिखांत न्हाऊन गेले. पटकन पुढे सरकून तुला घट्ट मिठी मारली. तू तुझ्या बाहुपाशात मला जखडून टाकलस अन मी तुझ्या छातीवर डोकं टेकवून तुझ्या हृदयाची धडधड ऐकु लागले.
तुझ्या पिळदार बाहूंना स्पर्श करण्याचा मोह न आवरून मी अलगद एक हात तुझ्या बाहूंवरून फिरवत होते. नकळत माझ्या ओठांचा स्पर्श तुझ्या छातीला झाला अन मी घाबरून मिठीतुन सुटण्याची धडपड करू लागली. तू मिठी सैल केलीस मला हायस वाटलं पण हसत एका हातानं पदर खेचत तू आणखी घट्ट मीठीत घेतलंस. पुन्हा माझा चेहरा निरखू लागलास गालावरून अलगद बोट फिरवत फिरवत ओठांकडे गेलास. ओठाला तुझ्या हाताचा स्पर्श होताच रोमांच फुलले. तू पुन्हा पुन्हा ओठावरून बोट फिरवत राहिलास. मी पटकन तुझा हात पकडून बाजूला सारला. तू मिठी आणखी घट्ट केलीस अन अलगद माझ्या चेहऱ्यावरचे थेंब ओठांनी टिपू लागलास. एक खट्याळ थेंब ओठावर सरकला अन तू पटकन ओठानी तो टिपलास. दोन्ही हातांनी तुला दूर सारत मी मागे झाले. दिव्याच्या चटक्याने मी भानावर आले.बाहेर अजुनही पाऊस सुरूच होता. स्वप्नातला तुझ्या ओठांचा तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. लिहलेल्या पत्रावरून हात फिरवला डोळ्यातले अश्रू पुसले आणि पुन्हा अंथरुणावर पडले. डोळे मिटले पुन्हा तुझ्या मिठीत यायला. पुन्हा एकदा तुला डोळे भरून पहायला. तुझा स्पर्श माझ्या रोमारोमात साठवुन घ्यायला .