Zimmad | झिम्माड – भाग १
कोकणातला तो न थांबणार पाऊस गर्द हिरवी वनराई तुडुंब भरलेल्या नद्या मातीचा गंध पडवीत उभं राहून दारातल्या पागोळ्यांची शुभ्र पांढरी धार पाहताना तिला अलगद हातात घेउन तिच्याशी खेळण्याचा मोह काही आवरत नाही. एकदा हातावर पावसाचं पाणी पडलं कि मन आपसूकच अंगणातल्या पावसात चिंब होऊन जात.कधी तरी मनाचं ऐकावं असं स्वतःच स्वतःला सांगत मी कधी अंगणात पोहचते माझं मलाच कळत नाही. एक एक थेंब अंग मोहरून जातो. एखादा खट्याळ थेंब तुझी आठवण करून देतो. अन पावसासोबत वाहवत जात मन तुझ्या मिठीत. अलगद एक थेंब गालावरून ओघळून ओठावर येतो अन त्या आठवणिने हृदयाची धडधड वाढते .नजर आपसूकच खाली जाते हळू हळू डोळे मिटले जातात अन तुझ्या पिळदार बाहूंनी जखडून टाकलेलं असत मला. तुझ्या इतकं जवळ आल्याने स्पंदने वाढली आहेत. तुझ्या छातीवर डोकं ठेऊन असच पावसात भिजत राहावं वाटतंय. इतक्यात अलगद माझ्या केसांची बट कपाळावरून मागे सारत माझ्या ओठांवरचा तो थेंब तुझ्या ओठांनी टिपण्याचा तुझा प्रयत्न पाहून तुझ्या मिठीतुन सुटण्याची माझी धडपड उलथून लावून तू तुझ्या बाहूंनी अजूनच घट्ट घातलेली ती पकड. माझं लाजणं तुझं मला निरखून पाहणं आणि नजरेनं नजरेशी नजरेतून बोलणं. तू नजरेत हरवून जाताच तुझी घट्ट पकड हलकेच सोडवून पटकन माझं धावणं आणि तितक्याच चपळाईन माझा पदर पकडून तुझं मला मागे खेचणं. पुन्हा घट्ट मिठीत तुझ्या चिंब ओली मी विरघळत गेली हळू हळू तुझ्यामध्ये.
अलगद एका थेंबान स्वप्नातून जागं केलं. तुझ्या आठवणींन माझं मन घायाळ झालं. पावसापरी तू हि यावा माझ्या अंगणात मला भिजवुन चिंब ओलं करावं सतत हेच मनात येत राहीलं. मग पावसाचा मनसोक्त आस्वाद घेऊन झाल्यावर वाफाळत्या चहाची आठवण होते आणि मग पावलं घराच्या दिशेने जातात. भिजलेलं अंग कोरड करीत मी वातावरणाची मजा अनुभवते हवेतला गारवा मन प्रसन्न करून जातो.
सभोवार आल्हादायक वातावरण, मातीच्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन,मातीचा तो सुगधं आणि स्वयंपाकघरातली चूल. सगळं अगदी मनासारखं आणि मनाजोकत पावसाळा आणि कोकण म्हणजे माझ्यासाठी आनंदाची पर्वणीच. चहाच्या आठवणीत मी स्वयंपाक घरात गेले.लगेच चुलीवर चहाच भांड चढवून चहा बनवला त्या वाफाळत्या चहाच्या कपाकडे पाहून मला पुन्हा एकदा तुझी आठवण येते. मग स्वतःच स्वतःच्या डोक्यावर टपली मारून स्वप्नात जाण्यापासून रोखते .गरमा गरम चहाचे भुर्के घेत मी चहा संंपवून स्वयंपाकाच्या तयारीला लागते.
रविवार आहे म्हणून मस्त कोंबडा कापायचा बेत केला. शेजारच्या बंडून कोंबडा कापून दिला. चूल पेटवली आणि चिकन फोडणीला टाकलं. कोंबडी वडे बनवायचे म्हणून दुपारीच पीठ मळून ठेवलं होत. दिवस मावळतीला गेला पाऊस असल्यानं सगळंच अंधारून आलं होत.पावसामुळं आता काही लाईट येणार नाही हे माहित असल्यानं मी घरभर दिवे लावले आणि मग स्वयंपाक घराकडे वळली. चुलीवरच चिकन रटारट शिजत होत. बाहेर पावसाचा जोर अजूनच वाढला हवेतला गारठा पाहता चुलीसमोरून बाजूला व्हायचं मन होईना. पटकन दुसऱ्या चुलीवर भात टाकला आणि देवघरात जाऊन दिवाबत्ती केली. परत येईतोपर्यंत चिकन शिजून तयार होत. त्याचा तो रटरट आवाज आणि घरभर सुटलेला घमघमाट ह्याने तोंडाला पाणी सुटलं होत. चुलीवरून पातेलं खाली घेतलं आणि चुलीवर कढई ठेवली. तेल तापलं तस वडे थापायला घेतले. आणि पुन्हा तुझ्या आठवणींन मन भरून आलं. हे सगळं बनवलं खरं पण खायला तू नाहीयस आणि डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. पण ते अलगद टिपायला तू जवळ नाहीयस. सगळं आवरलं बंड्याला बोलवून चिकन आणि वडे देऊन टाकले आणि तिखट मीठ घालून भात खाल्ला. सगळं आवरून अंथरुणावर पाठ टेकली नजर कौलांकडे आणि मन मात्र तुझ्या दुनियेत तुझ्यापाशी तुझ्या मिठीत तुला घट्ट बिलगलेलं.