संपूर्ण पसायदान – सोप्या मराठी अर्थासहित

संपूर्ण पसायदान

संपूर्ण पसायदान – सोप्या मराठी अर्थासहित

मराठी साहित्याला संत साहित्याचे मोठे वरदान लाभले आहे. या संत साहित्याचा पाय रचला तो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञान साधनेचे सर्वोच्च फलित म्हणजे ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील  ‘ज्ञान’,  श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले. 

     संत ज्ञानेश्वर  विरचित  ‘ ज्ञानेश्वरी ‘  या ग्रंथातील शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते. संत ज्ञानेश्वर महाराजांना माउली असे का म्हणतात हे जर समजून घ्यायचे असेल तर केवळ ‘पसायदान’ व्यवस्थित समजून घ्यायला हवे. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे “पसायदान ” मागितले. ‘पसायदान’ आपणा सर्वांना माहित आहेच परंतु त्याचा अर्थ सोप्या भाषेत लिहिण्याचा व आधुनिक पिढीला आपल्या मराठी मातीच्या संस्कारांशी जोडण्याचा हा छोटासा प्रयत्न.

 

आता विश्र्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।

संत ज्ञानेश्वर महाराज देवाला म्हणतात, हे देवा ‘ज्ञानेश्वरी’ च्या रूपाने मी हा जो वाग्यज्ञ मांडला आहे त्याने आपण संतुष्ट व्हावे आणि संतुष्ट होऊन आपण मला प्रसादरूपी दान द्यावे. 

 

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।

भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें ।।

खळ म्हणजे दुष्ट. व्यंकटी म्हणजे मनाचा कुटिलपणा, दुष्टपणा.  दुष्ट लोकांच्या अंतःकरणामधील कुटिलपणा जावो ही पहिली मागणी संत ज्ञानेश्वरांनी देवाकडे केली आहे. जे वाईट किंवा दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जाऊन चांगले कर्म करण्याची त्यांची आवड वाढो (रती म्हणजे आवड)अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराज देवाकडे करतात. मनाचा दुष्टपणा संपल्याने कोणताही जीव योग्य मार्गाला लागेल आणि मगच त्याच्यात प्रेमाचे, मैत्रीचे आणि विश्वाचे संबंध निर्माण होतील असे संत ज्ञानेश्वर महाराजांना वाटते. 

           इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, भगवत गीतेचा प्रवक्ता भगवान श्रीकृष्ण म्हणतात अधर्मी, पापी लोकांच्या विनाशासाठी मी स्वतः जन्म घेईन परंतु संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोणतीही व्यक्ती वाईट नसते फक्त त्याची प्रवृत्ती वाईट असते आणि अशी वाईट प्रवृत्ती ठिक केल्यास ती व्यक्ती नक्कीच योग्य मार्गाला लागेल. अशा विश्व कल्याणाच्या विचारामुळेच ज्ञानेश्वर महाराजांना ‘माउली’ असे म्हटले आहे.

 

दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।

दुरित म्हणजे पाप. लोकांना स्वधर्माचे आकलन व्हावे असे ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत आहे. धर्म म्हणे कर्तव्य, धर्म म्हणजे जबाबदारी. धर्म म्हणजे स्वतः बरोबरच इतरांच्या कल्याणासाठी केलेले कोणतेही कर्म. असे धर्मावर आधारित कर्म केल्याने वाईट लोकांच्या जीवनातील पापरूपी अंधार नाहीसा होईलच आणि त्याचबरोबर त्याला जे जे हवे आहे ते ते त्याला नक्कीच मिळेल.

 

वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ।।

सर्व लोकांवर प्रेमाचा, कल्याणाचा, मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ लोक या भूमीवर मोठ्या प्रमाणात निर्माण होवोत आणि सर्व प्राणिमात्रांना अनवरत म्हणजे निरंतर भेटत राहो अशी आकांक्षा संत ज्ञानेश्वर महाराजांना वाटते. 

 

चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।

त्या संतांच वर्णन संत ज्ञानेश्वर अस करतात कि ते संत म्हणजे कल्पतारुंचे उद्याने , चेत्नारूपी वातावरण निर्माण करणारे रत्न , आणि ज्यांचे बोल हे अमृताप्रमाणे आहेत असेच आहेत. हा ईश्वरनिष्ठांचा समुदायनसून जणू काही नाना वृक्षवेलींनी,फुलाफळांनी बहरलेले सुंदर उपवन (आरव) आहे. हे आरव असामान्य आहे हे इच्छिले फळ देणाय्रा कल्पवृक्षांनी व्यापलेले आहे आणि हे कल्पतरु (ईश्वरनिष्ठ संताची मांदियाळी ) अलौकिक आहेत कारण ते एका ठिकाणि स्थिर राहाणारे नसून चल म्हणज (चालते,बोलते ) कल्पतरू आहेत.

 

चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

पौर्णिमेचा पूर्ण चंद्र जरी बघितला तरी त्याच्यावर डाग आहे. पण ईश्वरनिष्ठ संत निष्कलंक असतात. मार्तंड म्हणजे सूर्य तेजाचा झगझगीत अग्नीगोल,तो तापहीन असूच शकत नाही. पण संत हे ज्ञानरुपी मार्तंड आहेत. त्याचे तेज दाहक नसून शीतल आहे. ते संत म्हणजे कोणताही डाग नसलेले चंद्र आहेत , ताप नसलेले सुर्य आहेत व ते सर्व सज्जनांचे मित्र आहेत.

 

किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं ।

भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।

ज्याच्या चित्तांत निरंतर समाधान ,शांती असते त्यांना संत म्हणावे. ही शांती कोणत्याही बाह्य गोष्टींवर ,वस्तूंवर,चित्ताच्या लहरीवर ,प्रवृतींवर अवलंबून नसते. ज्ञानयोगात जशी ज्ञाता ज्ञान,ज्ञेय अशी त्रिपुटी असते तशी ती कर्मयोगात,ध्यानयोगात,व भक्तियोगामधे आहे. ही त्रिपुटी जिंकल्याशिवाय चिरशांती प्राप्त होत नाही.  या पृथ्वीवरील सर्व लोकांनी सर्वतोपरी सुखी होऊन विश्वेवराची अखंडित सेवा करत राहावी.

 

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें ।

दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी ।।

‘ग्रंथोपजीविये’ म्हणजे ग्रंथ हेच तुमचे जीवन होऊन जावो.किंवा तुमचे जीवन ग्रंथरुप होऊन जावो. ग्रंथामध्ये वर्णिलेला आत्मसाक्षात्कार प्रत्यक्ष अनुभवास येवो. अशा असामान्य ग्रथांची व्याख्या समर्थ रामदासांनी केली आहे. ज्य मुळे धैर्य वाढते,निश्चय बळावतो,परोपकार घडतो,सर्व शंकांचे निरसन होते,बुध्दी निश्चयात्मक बनते त्याला ग्रंथ म्हणायचे. अद्वैतापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा ग्रंथ नाही असे अनेक जाणकारांणचे मत आहे.  हा ग्रंथच (ज्ञानेश्वरी) आपले जीवन बनवण्याचा व दृष्ट- अदृष्टावरविजय प्राप्त करण्याचा मनोदय केला पाहिजे.

 

तेथ म्हणे श्रीविश्र्वेशरावो । हा होईल दानपसावो ।

येणेंवरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।

हा विश्वाचा राव कोण आहे? जो प्रत्यक्ष आदिपुरूष सद्गुरु निवृत्तिनाथांच्या रुपाने प्रकटला आहे. तो विश्वेश्वर संतुष्ट झाला आणि तथास्तु म्हणाला. ‘ हा होईल दानपसावो ‘ हे दान असे आहे की,देणार्याला जास्त सुख व घेणार्याला कमी सुख देणारे आहे. तो कृपाप्रसाद सर्वांना लाभेल असे वरदान सद्गुरुंकडून मिळाले त्यामुळे संत ज्ञानेश्वरांना अतीव सुख झाले.

 

‘ पसायदान ‘ आपणा सर्वांना माहित आहेच परंतु त्याचा अर्थ सोप्या भाषेत लिहिण्याचा व आधुनिक पिढीला आपल्या मराठी मातीच्या संस्कारांशी जोडण्याचा हा छोटासा प्रयत्न ‘ मराठी शाळा ‘ या आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Sant Dnyaneshwar Maharaj | संत ज्ञानेश्वर महाराज

 

Tukaram Gatha | तुकाराम गाथा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top
डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information In Marathi Marathi Sarav pariksha 54
डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information In Marathi Marathi Sarav pariksha 54