मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ – जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.