Gautama Buddha | गौतम बुद्ध
बुद्ध (इ.स.पू. ६२३/ ५६३ – इ.स.पू. ५४३/ इ.स.पू. ४८) हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. गौतम बुद्ध, शाक्यमूनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक सम्मासंबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी क्षत्रिय कुळामध्ये इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे बुद्धाचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ (पाली भाषेत सिदत्थ गोतम) असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. इ.स.पू. ५४७ मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार बुद्धांना विष्णूच्या दशावतारातील नववा अवतार मानले जाते, तथापि बौद्ध धर्मात यास खोडसाळपणाचे समजले जाते.