१०० मराठी वाक्प्रचार : अर्थ व वाक्यात उपयोग | Marathi Vakprachar 100
मराठी भाषेत वाक्प्रचारांना विशेष महत्त्व आहे. वाक्प्रचारांमुळे भाषेला अधिक प्रभावीपणा, सौंदर्य आणि नेमकेपणा प्राप्त होतो. त्यामुळे बोलणे आणि लेखन अधिक समृद्ध व अर्थपूर्ण बनते.
शालेय अभ्यासक्रमात तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये वाक्प्रचारांवर आधारित प्रश्न वारंवार विचारले जातात. विशेषतः MPSC, PSI, STI, ASO, ZP, SSC Board आणि HSC Board यांच्या परीक्षांसाठी वाक्प्रचार हा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासाचा भाग आहे.
या लेखात आम्ही १०० महत्त्वाचे मराठी वाक्प्रचार त्यांच्या अर्थासह आणि वाक्यातील उपयोगासह दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाक्प्रचार सहज समजतील आणि परीक्षेत त्यांचा योग्य वापर करता येईल. तसेच मराठी भाषेचा प्रभावी वापर करण्यासाठीही हा संग्रह अत्यंत उपयुक्त ठरेल.
१०० मराठी वाक्प्रचार अर्थ व वाक्यात उपयोग
वाक्प्रचार म्हणजे काय?
शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार असे म्हणतात.
अ — आ वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचार
क — ख वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचारग — घ वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचारच — छ वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचारड वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचारत — थ वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचारद — ध वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचारन वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचारप — फ वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचारब — भ वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचारह वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचारइतर महत्वाचे वाक्प्रचार
| क्र. | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
|---|---|---|---|
| १ | अंगात वीज संचारणे | अचानक बळ येणे | देशभक्तीपर गाणी ऐकून नागरिकांच्या अंगात वीज संचारते. |
| २ | अंगाची लाही लाही होणे | अतिशय संताप होणे | पूर्ण दिवस काम करूनही पैसे न मिळाल्याने दिनेशच्या अंगाची लाही लाही झाली. |
| ३ | अंग चोरून काम करणे | फारच थोडे काम करणे | अंग चोरून काम करणे ही आळशी लोकांची सवय असते. |
| ४ | अंगवळणी पडणे | सवय होणे | सकाळी लवकर उठून व्यायाम करणे हे भरतच्या अंगवळणी पडले आहे. |
| ५ | अंगावर शहारे येणे | खूप घाबरणे | भूकंपाने झालेली हानी पाहून मदत पथकातील सर्वांच्याच अंगावर शहारे आले. |
| ६ | अंगावर मूठभर मांस चढणे | धन्यता वाटणे | गुरूने केलेल्या स्तुतीमुळे मानसीच्या अंगावर मूठभर मांस चढले. |
| ७ | अंतर देणे | सोडून देणे, परित्याग करणे | मुलांनी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना कधीही अंतर देऊ नये. |
| ८ | अंत होणे | मृत्यू होणे | अपघातामुळे अशोकचा दुःखद अंत झाला. |
| ९ | अधीर होणे | उत्सुक होणे | चार वर्षांनी आईला भेटण्यासाठी राहुल अधीर झाला होता. |
| १० | अन्नास मोताद होणे | गरीबीत दिवस काढणे | दुष्काळाने ग्रासलेल्या भागातील लोक अन्नास मोताद झाले. |
| ११ | अभिमान वाटणे | गर्व वाटणे | व्यवसायात मोठे यश मिळविल्यामुळे रमेशचा सर्वांना अभिमान वाटतो. |
| १२ | अभिवादन करणे | नमस्कार करणे | विशाखाने आई बाबांना अभिवादन केले. |
| १३ | अवहेलना करणे | अपमान करणे, अनादर करणे | माणसाच्या गरिबीवरून त्याची कधीही अवहेलना करू नये. |
| १४ | अस्मान ठेंगणे होणे | गर्वाने फुगून जाणे | परदेशी जाण्याची संधी मिळाल्यावर सुमीतला अस्मान ठेंगणे झाले. |
| १५ | अग्निप्रवेश करणे | स्वतःस जाळून घेणे | माधवरावांच्या मृत्यूनंतर रमाबाईंनी केलेला अग्निप्रवेश अतिशय दुःखदायक होता. |
| १६ | आण घेणे | शपथ घेणे | पोलिस झालेल्या प्रतिकने लाच न घेण्याची आण घेतली. |
| १७ | आत्मसात करणे | शिकणे | एखादी नवीन कला आत्मसात करावी लागते. |
| १८ | आसन डळमळणे | बसलेला जम विस्कटणे | सत्ताधारी पक्षातील घोटाळे उघडकीस आल्याने मुख्यमंत्र्यांचे आसन डळमळीत झाले. |
| क्र. | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
| १९ | कंबर कसणे | हिमतीने तयार होणे | १० वी च्या परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी सुरेशने कंबर कसली. |
| २० | कंठस्नान घालणे | ठार मारणे | सीमेवर भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैनिकांना कंठस्नान घातले. |
| २१ | कपाळाला हात लावणे | हताश होणे | क्रिकेटचा सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस सुरू झाल्याने प्रेक्षकांनी कपाळाला हात लावला. |
| २२ | कपाळमोक्ष होणे | मरण पावणे | दारू पिऊन गाडी चालविताना अपघात झाल्याने राकेशचा कपाळमोक्ष झाला. |
| २३ | कान टोचणे | चूक लक्षात आणून देणे | परीक्षेत मोबाईल खेळणाऱ्या मानसीचे तिच्या वडिलांनी कान टोचले. |
| २४ | कान उपटणे | कडक शब्दांत समजावणे | शाळेमध्ये दंगा करणाऱ्या दिनेशचे मुख्याध्यापकांनी कान उपटले. |
| २५ | कान फुंकणे | मनात शंका निर्माण करणे | एकमेकांचे कान फुंकल्याने कुटुंबात अनेकदा वाद निर्माण होतात. |
| २६ | कानावर घालणे | लक्षात आणून देणे | रोहितला कमी गुण मिळाल्याचे शिक्षकांनी त्याच्या वडिलांच्या कानावर घातले. |
| २७ | काढता पाय घेणे | परिस्थिती पाहून निघून जाणे | वाद होण्याची चिन्हे दिसू लागताच राजेशने बैठकीतून काढता पाय घेतला. |
| २८ | कापरे सुटणे | घाबरल्यामुळे थरथरणे | अचानक समोर आलेला वाघ पाहून राहुलच्या अंगाला कापरे सुटले. |
| २९ | कस लावणे | सामर्थ्य पणाला लावणे | हिंदकेसरी होण्यासाठी गण्या पहेलवानाने प्रत्येक कुस्तीत आपला कस लावला. |
| ३० | कसब दाखवणे | कौशल्य दाखवणे | कोणताही खेळ असो, खेळाडू त्यात आपले कसब दाखवतात. |
| ३१ | किरकिर करणे | सतत तक्रार करणे | मालकापाशी मजूर पगार कमी आहे म्हणून किरकिर करतात. |
| ३२ | कुंपणाने शेत खाणे | विश्वासू माणसाने घात करणे | व्यवस्थापकाने भ्रष्टाचार केल्याने कुंपणानेच शेत खाल्ल्याची चर्चा रंगली. |
| ३३ | केसाने गळा कापणे | विश्वासघात करणे | नोकराने चोरी करून सदाशिव रावांचा केसाने गळा कापला. |
| ३४ | खंड न पडणे | मध्ये न थांबणे | नित्यनेमाने देवपूजा करण्यात आजीचा कधीही खंड पडला नाही. |
| ३५ | खपणे | कष्ट करणे | चांगले पीक काढण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात खपतात. |
| ३६ | खांद्याला खांदा भिडवणे | एकत्र येऊन काम करणे | आजच्या युगात स्त्री-पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करतात. |
| क्र. | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
| ३७ | गट्टी जमणे | मैत्री होणे | गावी आलेल्या मालूची गावातल्या शालूशी चांगली गट्टी जमली. |
| ३८ | गळ्यात गळा घालणे | खूप पक्की मैत्री असणे | सोनाली आणि प्रियांका या दोघीजणी नेहमी गळ्यात गळा घालून फिरतात. |
| ३९ | गुडघे टेकणे | शरण येणे | शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपुढे मुघल फौजांनी गुडघे टेकले होते. |
| क्र. | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
| ४० | चेहरा खुलणे | आनंद होणे | लग्नाची तारीख ठरल्याचे कळताच मोनलचा चेहरा खुलला. |
| ४१ | चेहरा पडणे | दुःख होणे | अपेक्षित गुण न मिळाल्याने पल्लवीचा चेहरा पडला. |
| ४२ | छातीत धडधडणे | खूप भीती वाटणे | जंगलात अचानक सिंह समोर आल्याने पर्यटकांच्या छातीत धडधडले. |
| क्र. | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
| ४३ | डाळ न शिजणे | काही उपाय न चालणे | साक्षीने दिपकला पटवायचे बरेच प्रयत्न केले पण तिची डाळ शिजली नाही. |
| ४४ | डोक्यावर खापर फोडणे | दोषी ठरवणे | अनेकदा निरपराध लोकांच्या डोक्यावर गुन्ह्याचे खापर फोडले जाते. |
| ४५ | डोक्यात वीज चमकणे | पटकन समजणे | कठीण गणित सुटत नव्हते पण एका क्षणाला दिनेशच्या डोक्यात वीज चमकली. |
| ४६ | डोळा असणे | लक्ष असणे | शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर आपल्या जवानांचा डोळा असतो. |
| ४७ | डोळा लागणे | झोप लागणे | दिवसभर काम केल्याने सौरभचा रात्री अंथरुणावर पडल्यावर लगेचच डोळा लागला. |
| ४८ | डोळे उघडणे | अनुभवाने सावध होणे | आजारी पडल्याने सुमितचे व्यायाम करण्याबाबत डोळे उघडले. |
| ४९ | डोळेझाक करणे | दुर्लक्ष करणे | माणूस नेहमीच स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करतो. |
| ५० | डोळे निवणे | समाधानी होणे | विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचे डोळे निवले. |
| ५१ | डोळे पांढरे होणे | प्रचंड भीती वाटणे | डोळ्यासमोर भीषण अपघात पाहताच सोहमचे डोळे पांढरे झाले. |
| ५२ | डोळे विस्फारणे | आश्चर्याने पाहणे | सचिनला अचानक पाहून त्याच्या चाहत्यांचे डोळे विस्फारले. |
| ५३ | डोळे मिटणे | मरण पावणे | क्रांतिकारकांनी देशासाठी लढताना आनंदाने डोळे मिटले. |
| ५४ | डोळे वटारणे | रागाने पाहणे | वर्गात दंगा करणाऱ्या मुलांकडे गुरुजींनी डोळे वटारून पाहिले. |
| ५५ | डोळ्यात धूळ फेकणे | खोटे बोलून फसवणे | जमिनीच्या लालसेपोटी सुधाकरने त्याच्या भावाच्या डोळ्यात धूळ फेकली. |
| क्र. | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
| ५६ | तळपायाची आग मस्तकात जाणे | खूप राग येणे | मुलाचे सततचे खोटे बोलणे ऐकून राहुलच्या तळपायाची आग मस्तकात गेली. |
| ५७ | तोंड देणे | सामना करणे | प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देणाऱ्यालाच शेवटी यश मिळते. |
| ५८ | तोंड काळे करणे | कायमचे निघून जाणे | चोरी करताना सापडल्याने साखरामने गावातून तोंड काळे केले. |
| ५९ | तोंडचे पाणी पळणे | अतिशय घाबरणे | अवघड प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. |
| ६० | तोंडघशी पडणे | खोटे पकडले जाणे | खोटं बोलणे पकडले गेल्याने वनिता तोंडघशी पडली. |
| ६१ | तोंडात बोट घालणे | आश्चर्यचकित होणे | बारावीत पहिला क्रमांक आल्याचे कळताच कोमलने तोंडात बोट घातले. |
| ६२ | तोंडाला तोंड देणे | भांडणे | दारू पिलेल्या माणसाच्या तोंडाला तोंड दिल्याने वाद वाढतात. |
| ६३ | तोंडाला पाणी सुटणे | हाव निर्माण होणे | गुलाबजाम पाहून तन्वीच्या तोंडाला पाणी सुटले. |
| ६४ | तोंडाला कुलूप घालणे | गप्प बसणे | परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अविनाश तोंडाला कुलूप घालून बसला होता. |
| क्र. | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
| ६५ | दात ओठ खाणे | राग व्यक्त करणे | लोकांसमोर झालेला अपमान पाहून मयूर दात ओठ खात निघून गेला. |
| ६६ | दात विचकणे | निर्लज्जपणे हसणे | सायकलवरून मुलगा पडल्याचे दिसताच अभिषेक दात विचकून हसत होता. |
| ६७ | दिवस पालटणे | परिस्थिती बदलणे | खूप मेहनत केली तर आपले दिवस नक्की पालटतात. |
| ६८ | धडपड करणे | खूप कष्ट करणे | पोट भरण्यासाठी महादू दिवसभर काही ना काही धडपड करतो. |
| ६९ | धन्य होणे | कृतार्थ होणे | मुलाचे उज्ज्वल यश पाहून यशोदाबाई धन्य झाल्या. |
| ७० | धास्ती घेणे | धसका घेणे | एकदा पाय घसरून पडल्यामुळे मीराबाई अंधारात जाण्याची धास्ती घेतली. |
| ७१ | धूम ठोकणे | पळून जाणे | पोलिसांना पाहताच चोरांनी धूम ठोकली. |
| क्र. | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
| ७२ | नवल वाटणे | आश्चर्य वाटणे | आईने आणलेली नवी सायकल पाहून विघ्नेशला नवल वाटले. |
| ७३ | नाक खुपसणे | गरज नसताना सहभागी होणे | नाक खुपसण्याच्या सवयीमुळे शोभाचे अनेकदा हसू झाले. |
| ७४ | नाक कापणे | अपमान करणे | मुलगा नापास झाल्याने मीरा काकूंचे सर्वांसमोर नाक कापले. |
| ७५ | नाक मुरडणे | नापसंती दर्शवणे | दिवाळीला आणलेला नवा ड्रेस न आवडल्याने सोनमने नाक मुरडले. |
| ७६ | नाकी नऊ येणे | दमछाक होणे | महागाईमुळे घर चालविताना सीमा काकूंच्या नाकी नऊ येतात. |
| ७७ | नाक घासणे | लाचार होऊन माफी मागणे | चुकीचा आरोप केल्याचे सिद्ध झाल्याने अनिकेतला सर्वांसमोर नाक घासावे लागले. |
| ७८ | नजर चुकवणे | गुपचूप हालचाल करणे | पोलिसांची नजर चुकवून चोर पळून गेले. |
| क्र. | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
| ७९ | पदरी घेणे | स्वीकार करणे | पतीचे निधन झाल्यावर कमलाबाईंनी एकाकीपणाचे दुःख पदरी घेतले. |
| ८० | पहारा देणे | राखण करणे | भारतीय सैनिक सीमेवर रात्रंदिवस कडक पहारा देतात. |
| ८१ | पाय घसरणे | मोहात फसणे | झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक जणांचा पाय घसरतो. |
| ८२ | पाय मोकळे करणे | फिरायला जाणे | जेवण झाल्यावर लोक पाय मोकळे करायला जातात. |
| ८३ | पारंगत असणे | तरबेज असणे | वयाच्या तिसऱ्या वर्षी छोटा राहुल संगणक वापरण्यात पारंगत झाला. |
| ८४ | पोटाशी धरणे | माया करणे | कांगारू आपल्या पिलाला नेहमी पोटाशी धरून असते. |
| ८५ | पोटात ठेवणे | गुपित सांभाळणे | दहावीत नापास झाल्याची गोष्ट त्याने सर्वांपासून पोटात ठेवली. |
| ८६ | पोरकी होणे | अनाथ होणे | करोना साथीमुळे खूप मुले पोरकी झाली. |
| ८७ | प्रत्यय येणे | प्रचीती येणे | आषाढी एकादशीला भक्तांच्या विठ्ठलभक्तीचा प्रत्यय येतो. |
| ८८ | प्रभावित होणे | छाप पडणे | महात्मा गांधीजींचे देशकार्य पाहून विनोबा भावे प्रभावित झाले. |
| ८९ | प्रतीक्षा करणे | वाट पाहणे | बस येण्याची आम्ही बस स्थानकावर प्रतीक्षा करत होतो. |
| क्र. | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
| ९० | भान ठेवणे | जाणीव ठेवणे | दुःखात साथ करणाऱ्या उपकारकर्त्याचे माणसाने नेहमी भान ठेवावे. |
| ९१ | भुरळ पडणे | मोह होणे | गीताने काढलेल्या सुंदर चित्राकडे पाहून मितालीला भुरळ पडली. |
| क्र. | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
| ९२ | हात देणे | मदत करणे | गावातील संपदकाका गरीब लोकांना नेहमी मदतीचा हात देतात. |
| ९३ | हातातोंडाशी गाठ पडणे | जेमतेम खायला मिळणे | शेव सर्वांना वाटता वाटता रामूच्या हातातोंडाशी गाठ पडली. |
| ९४ | हाडे खिळखिळी करणे | खूप मार देणे | पोलिसांनी चोरांना पकडून त्यांची हाडे खिळखिळी केली. |
| ९५ | हेवा वाटणे | मत्सर वाटणे | सागरच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा त्याच्या मित्रांना नेहमी हेवा वाटतो. |
| क्र. | वाक्प्रचार | अर्थ | वाक्यात उपयोग |
| ९६ | जिभेला हाड नसणे | वाटेल ते बोलणे | राग आलेली व्यक्ती जिभेला हाड नसल्याप्रमाणे बोलते. |
| ९७ | जीव की प्राण असणे | खूप प्रिय असणे | प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा देश जीव की प्राण असतो. |
| ९८ | रक्ताचे पाणी करणे | अतिश्रम करणे | जॉब मिळविण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागते. |
| ९९ | लाडीगोडी लावणे | खुश करणे | लहान भाऊ आईने पैसे द्यावेत म्हणून लाडीगोडी लावत होता. |
| १०० | स्तिमित होणे | आश्चर्यचकित होणे | मोनलचे नृत्य पाहून सर्व प्रेक्षक स्तिमित झाले. |
वाक्प्रचार — वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
MPSC परीक्षेत साधारणतः ५ ते १० वाक्प्रचारांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
या पेजवर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठी वाक्प्रचार PDF download करू शकता.





