मराठी वाक्प्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग | Vakprachar arth ani vakyat upyog

मराठी वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग | Vakprachar arth ani vakyat upyog

शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार असे म्हणतात. मराठी वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग आज आपण बघणार आहोत . 1. अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे. देशभक्तीपर गाणी ऐकून नागरिकांच्या अंगात वीज संचारते.
2. कपाळाला हात लावणे – हताश होणे, निराश होणे. क्रिकेटचा सामना सुरु होण्यापूर्वी जोरदार पाऊस सुरु झाल्याने प्रेक्षकांनी कपाळाला हात लावला.
3. अंगाची लाही लाही होणे – अतिशय संताप होणे. पूर्ण दिवस काम करूनही पैसे न मिळाल्याने दिनेशच्या अंगाची लाही लाही झाली.
4. कंबर कसणे – एखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने तयार होणे. १० वी च्या परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी सुरेशने कंबर कसली.
5. कंठस्नान घालने – ठार मारणे, मारून टाकणे. सीमेवर भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैनिकांना कंठस्नान घातले.
6. केसाने गळा कापणे – विश्वासघात करणे. नोकराने चोरी करून सदाशिव रावांचा केसाने गळा कापला.
7. कान फुंकणे – दुसऱ्याच्या मनात शंका निर्माण करणे, चहाडी करणे. एकमेकांचे कान फुंकल्याने कुटुंबात अनेकदा वाद निर्माण होतात.
8. अंग चोरून काम करणे – फारच थोडे काम करणे. अंग चोरून काम करणे ही आळशी लोकांची सवय झालेली असते.
9. अंगवळणी पडणे – सवय होणे. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे हे भरतच्या अंगवळणी पडले आहे.
10. कपाळमोक्ष होणे – मरण पावणे, मृत्यू ओढवणे. दारू पिऊन गाडी चालविताना अपघात झाल्याने राकेशचा कपाळमोक्ष झाला.
11. काढता पाय घेणे – परिस्थिती पाहून निघून जाणे. वाद होण्याची चिन्हे दिसू लागताच राजेशने बैठकीतून काढता पाय घेतला.
12. कान टोचणे – चूक लक्षात आणून देणे. परीक्षेच्या काळात सुद्धा मोबाईल खेळणाऱ्या मानसीचे तिच्या वडिलांनी कान टोचले.
13. कान उपटणे – कडक शब्दांत समजावणे. शाळेमध्ये दंगा करणाऱ्या दिनेशचे मुख्याध्यापकांनी कान उपटले.
14. कानावर घालने – लक्षात आणून देणे. रोहितला परीक्षेत कमी गुण मिळाल्याचे त्याच्या शिक्षकांनी त्याच्या वडिलांच्या कानावर घातले.

वाक्यप्रचार, त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग | Marathi vakprachar, arth ani vakyat upyog

15. खांद्याला खांदा भिडवणे – एकत्र येऊन काम करणे. आजच्या युगात स्री-पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करतात.
16. गळ्यात गळा घालणे – खोलवर प्रेम असणे, खूप पक्की मैत्री असणे. सोनाली आणि प्रियांका या दोघीजणी नेहमी गळ्यात गळा घालून फिरतात.
17. चेहरा खुलणे – आनंद होणे. लग्नाची तारीख ठरल्याचे कळताच मोनलचा चेहरा खुलला.
18. चेहरा पडणे – दुःख होणे, वाईट वाटणे. अभ्यास करूनही अपेक्षित गुण न मिळाल्याने पल्लवीचा चेहरा पडला.
19. छातीत धडधडणे – खूप भीती वाटणे. जंगलात फिरत असताना अचानक सिंह समोर आल्याने पर्यटकांच्या छातीत धडधडले.
20. जिभेला हाड नसणे – विचार न करता बोलणे, वाटेल ते बोलणे. राग आलेली व्यक्ती जिभेला हाड नसल्याप्रमाणे बोलते.
21. जीव की प्राण असणे – खूप प्रिय असणे. प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा देश जीव की प्राण असतो.
22. डोक्यावर खापर फोडणे – चूक नसतानाही एखाद्याला दोषी ठरवणे. अनेकदा निरपराध लोकांच्या डोक्यावर गुन्ह्याचे खापर फोडले जाते.
23. डोळा असणे – लक्ष असणे, नजर असणे. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर आपल्या जवानांचा डोळा असतो.
24. डोळा लागणे – झोप लागणे. दिवसभर काम केल्याने सौरभचा रात्री अंथरुणावर पडल्यावर लगेचच डोळा लागतो.
25. डोळे उघडणे – अद्दल घडणे, अनुभवाने सावध होणे. आजारी पडल्याने सुमितचे व्यायाम करण्याबाबत डोळे उघडले.
26. डोळेझाक करणे – दुर्लक्ष करणे. माणूस नेहमीच स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करतो.
27. डोळे निवणे – समाधानी होणे. विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचे डोळे निवले.
28. डोळे पांढरे होणे – प्रचंड भीती वाटणे. डोळ्यासमोर भीषण अपघात पाहताच सोहमचे डोळे पांढरे झाले.
29. डोळ्यात धूळ फेकणे – खोटे बोलून फसवणे. जमिनीच्या लालसेपोटी सुधाकरने त्याच्या अशिक्षित भावाच्या डोळ्यात धूळ फेकली.
30. डोळे विस्फारणे – आश्चर्याने पाहणे. सचिनला अचानक पाहून त्याच्या चाहत्यांचे डोळे विस्फारले.
31. डोळे मिटणे – मरण पावणे. क्रांतिकारकांनी देशासाठी लढताना आनंदाने डोळे मिटले.
32. डोळे वटारणे – रागाने पाहणे. वर्गात दंगा करणाऱ्या मुलांकडे गुरुजींनी डोळे वटारून पहिले.
33. तोंड देणे – सामना करणे. प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देणाऱ्याचा लोकांनाच शेवटी यश मिळते.
34. तोंड काळे करणे – कायमचे निघून जाणे. चोरी करताना सापडल्याने साखरामने गावातून तोंड काळे केले.
35. तोंडचे पाणी पळणे – अतिशय घाबरणे. अतिशय अवघड प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
36. तोंडघशी पडणे – खोटे पकडले जाणे. खोटं बोलणे पकडले गेल्याने वनिता तोंडघशी पडली.
37. तळपायाची आग मस्तकात जाणे – खूप राग येणे. मुलाचे सततचे खोटे बोलणे ऐकून राहुलच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
38. तोंडात बोट घालणे – आश्चर्यचकित होणे. बारावीच्या परीक्षेमध्ये वर्गात पहिला क्रमांक आल्याचे कळताच कोमलने तोंडात बोट घातले.
39. तोंडाला तोंड देणे – भांडणे. दारू पिलेल्या माणसाच्या तोंडाला तोंड दिल्याने वाद वाढतात.
40. तोंडाला पाणी सुटणे – हाव निर्माण होणे. गुलाबजाम पाहून तन्वीच्या तोंडाला पाणी सुटले.
41. तोंडाला कुलूप घालणे – काही न बोलणे, गप्प बसणे. नवरा बायकोच्या भांडणात एकाने तोंडाला कुलूप घालणे गरजेचे असते.
42. दात ओठ खाणे – राग व्यक्त करणे, चीड व्यक्त करणे. लोकांसमोर झालेला अपमान पाहून मयूर बैठकीतून दात ओठ खात निघून गेला.
43. दात विचकणे – निर्लज्जीत होऊन हसणे. सायकलवरून मुलगा पडल्याचे दिसताच अभिषेक दात विचकून हसत होता.
44. नवल वाटणे – आश्चर्य वाटणे. आईने आणलेली नवी सायकल पाहून विघ्नेशला नवल वाटले.
45. नाक खुपसणे – गरज नसताना सहभागी होणे. नाक खुपसण्याच्या सवयीमुळे शोभाचे अनेकदा हसू झाले.
46. नाक कापणे – अपमान करणे. मुलगा नापास झाल्याने मीरा काकूंचे सर्वांसमोर नाक कापले.
47. नाक मुरडणे – नापसंती दर्शवणे. दिवाळीला आणलेला नवा ड्रेस न आवडल्याने सोनमने नाक मुरडले.
48. नाकी नऊ येणे – दमछाक होणे, धावपण होणे. महागाईमुळे घर चालविताना सीमा काकूंच्या नाकी नऊ येतात.
49. नाक घासणे – लाचार होऊन माफी मागणे. चुकीचा आरोप केल्याचे सिद्ध झाल्याने अनिकेतला सर्वांसमोर नाक घासावे लागले.
50. नजर चुकवणे – गुपचूप हालचाल करणे. पोलिसांची नजर चुकवून चोर पळून गेले.

मराठी वाक्यप्रचारची PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

५० मराठी वाक्यप्रचार

Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद यांचे सुविचार

Spread the love

Leave a Reply